एर्नाकुलम (केरळ) : केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या मणिपूरमधील घराला आंदोलकांनी काल रात्री आग लावली. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतले आहेत. मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त चालकुडी मतदारसंघासह चार लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते कोची येथे आले होते. मात्र दंगलखोरांनी घराला आग लावल्याची माहिती मिळताच मंत्री कार्यक्रम रद्द करून आपल्या गावी परतले आहेत.
'दंगल गैरसमजातून झाली' : यावेळी माध्यमांशी बोलताना राजकुमार रंजन सिंह म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारचे मणिपूरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांचे घर जाळले हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. मणिपूरमधील समस्या धार्मिक नसल्याचे राजकुमार रंजन सिंह यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
मणिपूरमधील दंगल गैरसमजातून झाली आहे. संघर्ष टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. दोन गटातील भांडणात दंगल झाली आहे. केंद्र सरकार पहिल्यापासून शांततेसाठी प्रयत्न करत आहे. शांतता सेनेची नियुक्ती करून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही अनपेक्षित घटना घडली. परिस्थिती शांत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. - डॉ. राजकुमार रंजन सिंह, केंद्रीय मंत्री
मंत्र्यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला : मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून हिंसाचाराचे सत्र चालूच आहे. काल रात्री हिंसक आंदोलकांनी केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. मात्र घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. परिस्थिती हाताळण्यासाठी, इंफाळ पूर्व पोलिसांनी आर के रंजन सिंह यांच्या निवासस्थानाजवळ जमाव पांगवून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे. एका महिन्यापूर्वी देखील मंत्र्यावर असाच हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी 15 जून रोजी इंफाळ पूर्वेतील न्यू चेकॉन भागात आंदोलकांनी एक घर जाळले होते. या भागात कुकी, मेईटी, मुस्लिम आणि बंगाली वंशाच्या लोकांचे प्राबल्य आहे.
हेही वाचा :
- Manipur Violence: हिंसक जमावाने पेटवले केंद्रीय मंत्र्याचे घर; आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला