शिमला - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल शनिवारी शिमला येथे पोहोचले. शिमलाच्या प्रसिद्ध कालीबारी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल यांनी आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच गोयल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात होत आहेत. मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यावेळी आठ टप्प्यात होत आहेत. तर मग यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे. इतका राग कशाचा, असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर निवडणुका किती टप्प्यात घेता येतील, हे ठरले. त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे, असे गोयल म्हणाले.
पश्चिम बंगालमधील ममतांचे सरकार बदलणे निश्चित आहे. तेथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांनी आपले आयुष्य मोठ्या संकटात घालवले आहे, असेही ते म्हणाले.