नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या बराच वाद सुरू आहे. मात्र या वादावर गृहमंत्री अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील कामगारांचा सन्मानही करण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली आहे. देशातील 19 पक्षांनी नवीन संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
राष्ट्रवादीचे खासदारही जाणार नाहीत :नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमाला देशातील तब्बल 19 पक्षांनी विरोध करत बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. त्यामुळे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद आणखी चिघळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.