नवी दिल्ली - अँटिलिया स्फोटक प्रकरण, सचिन वाझे अन् मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्यात प्रचंड उलथापालथी सुरू असून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने आरोप करत सरकारला जेरीस आणले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची बाजू सावरण्यासाठी सरकारचे कर्ते-करविते शरद पवार डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले आहेत.
दुसरीकडे गुजरातमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून शाह यांच्या भेटीच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे, तर अमित शाह यांनी काही गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असे वक्तव्य करून सस्पेन्स वाढवला आहे.