नवी दिल्ली - दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले होते. अमित शाह यांनी बोलावलेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. यावेळी भाजपाचे इतर नेतेही हजर असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळ विस्तार या विषयांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया -साखर उद्योगाला बळकटी व सक्षम करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्राच्यावतीने मी सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी साखर उद्योग अतिशय गांभीर्याने घेतला आहे. मार्जिन मनी, खेळते भांडवल, प्राथमिक कृषी संस्थांचे कर्ज पुनर्गठन आणि बळकटीकरण असावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपाल पदमुक्त विषय -आपल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. कोश्यारी आणि वाद असे समीकरणच गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याची वारंवार मागणी केली होती. राज्यपालांच्या वक्तव्याने भाजपचीही कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या विषयावर देखील आज दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.