नवी दिल्ली Pneumonia Outbreak : आधी कोरोना आणि आता आणखी एक तसाच आजार. चीनमधील या 'गूढ' आजाराबाबत भारत सतर्क झाला आहे. केंद्र सरकारनं राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिलाय. हा आजार 'न्यूमोनिया' सारखा असल्याचं बोललं जातंय. कोविडच्या काळात ज्या प्रकारे अराजकता निर्माण झाली होती, तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे आधीच सावध पावलं उचलली जातायेत.
आरोग्य सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश : सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना सल्ला देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, तुम्ही तुमच्या ठिकाणाच्या आरोग्य सुविधांचा आढावा घ्या आणि कोविडच्या संदर्भात जी काही देखरेख समिती स्थापन केली गेली, त्याच्या ऑपरेशनची तयारी करा. सरकारनं जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये नवीन आजार श्वसनाशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे. श्वसनाचे आजार प्रामुख्याने SARS-CoV2, मायकोप्लाझ्मा आणि इन्फ्लूएंझा मुळे होतात.
कोणता आजार आहे : चीनमध्ये ज्या रोगाचा प्रसार वाढतोय, त्याबद्दल अद्याप जास्त माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सच्या आधारे म्हटलं जातंय की, हा आजार मुलांच्या श्वसन प्रणालीवर हल्ला करू शकतो. ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये H9N2 विषाणूची पुष्टी झाली होती. हा विषाणू प्रामुख्यानं एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, हा आजार माणसाकडून माणसांमध्ये फार वेगानं पसरत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. मात्र हा रोग प्राण्यांमध्ये पसरू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.