चंदीगड- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी चंदीगडच्या दौऱ्यावर पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या आर्थिक कामगिरीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येण्याबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे.
निर्मला सीतारामण म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7 सप्टेंबरचा जन्मदिवस ते 7 ऑक्टोबरपर्यंत भाजपकडून देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 वर्षांपासून सरकारमध्ये राहून देशाची सेवा करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री तर सध्या देशाचे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत आहेत.
हेही वाचा-भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू
सरकारकडून परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न-
कोरोनाच्या संकटाने देशातील लघू आणि मोठ्या उद्योगांवर मोठा वाईट परिणाम झाला आहे. सरकारकडून परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. कर्जहमी देऊन कर्ज देण्याकरिता विविध मोठ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरो बॅलन्सवर बँक खाते सुरू केली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी खिल्ली उडविली होती. त्याच बँक खात्यांमध्ये सरकारकडून लाभार्थ्यांना रक्कम पाठविली जात आहे.