नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीची माहिती नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला केंद्रीय माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur), कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar आणि आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Health Minister Mansukh Mandaviya) सहभागी होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाने २३ हजार कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या पायाभूत निधीचा वापर करू शकतात. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडणार नाहीत. शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री तोमर म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मदत केली जाणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर कृषी उत्पन्न बाजार समिती करू शकणार आहेत.
नारळ बोर्ड कायद्यात होणार बदल-
देशात मोठ्या प्रमाणात नारळाचे क्षेत्र आहे. १९८१ मध्ये नारळ बोर्ड कायदा अस्तित्वात आला. त्यामध्ये बदल करून अध्यक्ष हा बिगर सरकारी असण्याची तरतूद करण्यात येणार आहे.