नवी दिल्ली : दिल्ली एनसीआर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणासह उत्तर पश्चिम भारतात थंडीची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील आठवड्यात 50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. दिल्लीतही हलका पाऊस अपेक्षित आहे. हवामान कार्यालयाने म्हटले आहे की रात्री खूप हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी अंशतः ढगाळ आकाशासह मध्यम ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता :आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे की, 21 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत वायव्य भारतावर सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली, 21 जानेवारीच्या पहाटे पश्चिम हिमालयीन प्रदेशात पाऊस, बर्फ सुरू होण्याची आणि 25 जानेवारीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान कार्यालयाने पुढे सांगितले की, 23 आणि 24 जानेवारी रोजी जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम गारपिटीची शक्यता आहे.
यलो अलर्ट :आयएमडीने पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये गुरदासपूर, फिरोजपूर, मुक्तसर, जालंधर, होशियारपूर आणि भटिंडा सुरू आहेत. फाजिल्का, बर्नाला, संगरूर, लुधियाना आणि फतेहगढ साहिब हे जिल्हे यलो अलर्टवर आहेत. हरियाणात सोनीपत, झज्जर, रेवाडी, सोनीपत आणि हिस्सार हे ऑरेंज अलर्टवर आहेत, तर अंबाला, कुरुक्षेत्र, भिवानी आणि पलवल यलो अलर्टवर आहेत. उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात यलो अलर्ट आहे.