प्रयागराज (उ. प्रदेश) : अतिक अहमद टोळीचा शूटर बल्ली उर्फ सुधांशू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळपासून या बाबतची चर्चा जोर धरू लागली आहे. शनिवारी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेला व्हिडिओ 19 फेब्रुवारीचा आहे. यामध्ये उमेश पाल खून प्रकरणाचा शूटर साबीर आतिकची पत्नी शाइस्ता परवीनसोबत दिसत होता. हे सर्व धूमनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नीवा परिसरात असलेल्या अतिक अहमदचा शूटर बल्ली सुधांशूच्या घरी गेले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रयागराज पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी बल्लीच्या अड्ड्यांवर छापे टाकून त्याला ताब्यात घेतले. तर उमेश पाल खून प्रकरणापासून बल्ली इतर शूटर्ससह फरार होता. मात्र, बल्लीला ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही.
बल्लीच्या माध्यमातून पोलिसांचा शोध : उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन आणि इतर शूटर्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रविवारी बल्ली उर्फ सुधांशूला ताब्यात घेतले. शाइस्ता परवीन कोठे आहे आणि तिच्यासोबत या घटनेत गोळीबार करणारा साबीर कुठे आहे, याचा पोलीस बल्लीच्या माध्यमातून शोध घेत आहेत. या सोबतच उमेश पाल हत्याकांडानंतर साबीर, अरमान, असद, गुड्डू मुस्लिम आणि गुलाम हे शूटर्स कुठे लपले आहेत, याचा शोध घेणे देखील चालू आहे.