भोपाळ- भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी असंयमी भाषेबद्दल माफी मागितली आहे. नोकरशाही आमची चप्पल उचलते, असे विधान केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी सारवासारव करणारे ट्विट केले आहे.
भाजपच्या नेत्या उमा भारती म्हणाल्या, की मला दु:ख आहे. मी असंयमी भाषेचा वापर केला, मात्र भावना चांगली होती. मोजक्या लोकांमध्ये अनौपचारिक बोलतानाही भाषा सुधारून वापरावी, हा धडा मी आजपासून शिकला आहे. प्रामाणिक नोकरशाही ही सत्तेत असलेल्या सामर्थ्यवान, सत्य आणि चांगला उद्देश असलेल्या नेत्यांना पाठिंबा देते. असा माझा अनुभव आहे. ती बैठक अनौपचारिक होती, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी
उमा भारतींनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत नोकरशाहीला कमी लेखत टीका केली होती. या बैठकीत ओबीसींच्या प्रतिनिधींनी जातिनिहाय लोकसंख्येची व खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली होती. जर निर्णय घेतला नाही तर, आंदोलन करू, असा या प्रतिनिधींनी इशाराही दिला आहे.