निवाडी/भोपाल - दारूबंदीबाबत आवाज उठवणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा लढण्याच्या मूडमध्ये आहेत. ओरछा येथील दारू दुकानाला विरोध करताना उमा भारती यांनी शेण फेकून निषेध नोंदवला आहे. याआधी उमा भारती यांनी भोपाळमधील दारूच्या दुकानावर दगडफेक केली आहे. उमा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'दारू बंदी ही एक सामाजिक मोहीम आहे, राजकीय नाही. समाजाच्या बळावर आणि एकजुटीनेच हा प्रश्न सुटणार आहे. असही त्या म्हणाल्या आहेत.
मध्य प्रदेशात दारूबंदीची मागणी करत राजधानीच्या दारुच्या दुकानावर दगडफेक करून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती पुन्हा एकदा दारूच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. उमा भारती यांनी काल रात्री राजधानीतील होशंगाबाद रोडवरील आशिमा मॉलसमोरील एका दारूच्या दुकानासमोर बसून येथे जमलेल्या गर्दीमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
उमा भारती म्हणाल्या होत्या की, यापुढे त्या दुकानावर दगडफेक करणार नाहीत, कारण दगडफेक हे कृत्य गुन्ह्याच्या श्रेणीत येते. आता दगड फेकीऐवजी शेण फेक करणार आहोत. ते गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.