चमोली- चमोली जिल्ह्यातील हिमस्खलन झालेल्या भागात अद्यापही बचावकार्य सुरू असून आत्तापर्यंत ४० मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, दिडशेपेक्षा जास्त कामगारांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पस्थळी बचावकार्य सुरू असून चिखल काढण्यात येत आहे.
अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही -
४० मृतदेह हाती लागले असून यातील अनेकांची ओळख पटलेली नाही, असे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणाले. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, पोलीस, निमलष्करी दलांनी बचावकार्यात सहभाग घेतला आहे. जेसीबीद्वारे बोगद्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
बोगद्यातून चिखल आणि गाळ काढण्याचे काम सुरू -
तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पातच्या बोगद्यात अनेक कामगार अडकून पडले आहेत. घटना घडून सहा दिवस उलटल्याने कामगार आत जिवंत आहेत की मृत्यू झाला आहे, याचीही माहिती मिळत नाही. सध्या बोगद्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, आतमध्ये किती गाळ आहे? किती कामगार आत अडकलेत? त्यांची स्थिती काय आहे? आत शिरण्याचा मार्ग कोणता अशी सर्व माहिती रिमोट सेन्सिंगद्वारे मिळवता आली असती. मात्र, ही नैसर्गिक आपत्ती इतकी भयंकर आहे की, यापुढे तंत्रज्ञानही कुचकामी ठरले.
ऋषीगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क केले आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन रेणी भागात हिमस्खलन झाल्याने अचानक पूर आला. या धौली गंगा आणि ऋषीगंगा नदीमार्गावर दोन उर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. येथे शेकडो कामगार काम करत होते. अचानक पूर आल्याने यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही जण उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.