भुवनेश्वर- इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ओरिसाच्या मधुस्मिता जेना सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांचे वय 41 वर्षे आहे. त्यांनी रविवारी मँचेस्टरमध्ये संबळपुरी हातमागाची साडी परिधान करून 42.5 किमी मॅरेथॉन धावली. ही मॅरेथॉन त्यांनी चार तास व पन्नास मिनिटात पूर्ण केली. मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये मधुस्मिता यांनी संबळपुरी साडी नेसून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मॅरेथॉन पूर्ण केले. मधुस्मिता स्पर्धेत सहभागी झालेल्या 18,577 सहभागींपैकी 14,585 या क्रमांकावर राहिल्या होत्या.
मूळ ओडिशातील कटक जिल्ह्यातील खापुरिया येथील मधुस्मिता अनेक वर्षांपासून मँचेस्टरमध्ये राहत आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण मँचेस्टरमध्ये झाले. त्यांचे वडील नीरेंद्र हे मँचेस्टर येथील स्थानिक सरकारी रुग्णालयात अटेंडिंग फिजिशियन म्हणून काम करतात. भुवनेश्वर येथील रहिवासी असलेल्या सायन दास यांच्याशी मधुस्मिता यांचे लग्न झाल्यानंतर त्या काही काळ इजिप्तमध्ये राहिल्या. पण त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी, मधुस्मिता मँचेस्टरला परतल्या आहेत. त्या हायस्कूल शिक्षिका म्हणून काम करतात.
लहानपणापासूनच संस्कृती आणि परंपरेची आवड -मधुस्मिता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना लहानपणापासूनच संस्कृती आणि परंपरेची आवड आहे. लहानपणी त्या भारतात आल्यावर ओडिसा भाषा आवर्जून शिकत. त्यांना नेहमीच साडी नेसायला आवडते. त्या मँचेस्टरमध्येदेखील भारतीय परंपरा न विसरता साडी परिधान करतात मॅरेथॉनमध्ये धावण्याची आवड व साडी नेसण्याची आवड असल्याने त्यांनी मोठा निर्णय घेतला. थेट साडी नेसून मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा! रस होता. त्यांनी आई आणि मैत्रिणींशी याबाबत चर्चा करून संबळपुरी साडी नेसण्याचा निर्णय झाला.