मुंबई : मुंबईत 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आरोपी कॅनडातील व्यापारी तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यापारी तहव्वूर राणा याचा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. आरोपी राणाचे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेच्या न्यायालयाने मान्यता देणे हे देशासाठी मोठे यश असल्याची प्रतिक्रिया सरकारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. या राणाच्या प्रत्यार्पणाचा खटला भारताकडून अॅड.उज्वल निकम हे लढत होते.
अमेरिकेकडे प्रत्यार्पणाची 2020 ला केली होती विनंती : मुंबईत झालेल्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 भारतीयांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच्या प्रत्यापर्णासाठी भारताने अमेरिकेकडे 10 जून 2020 रोजी 62 वर्षीय राणाची तात्पुरत्या अटकेची मागणी करणारी तक्रार दाखल केली होती. या विनंतीला अमेरिकेतील बायडेन सरकानेही पाठिंबा दिला होता आणि आता प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती. अमेरिकेच्या न्यायालयाने भारताच्या विनंतीला पाठिंबा देत, तहव्वूर याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे.
मोठी ऐतिहासिक घटना : भारताच्या इतिहासात प्रथमच अशी एखादी घटना घडली आहे की, जो अमेरिकन नागरिक आहे. तिथल्या न्यायालयाने त्याला भारताकडे सुपूर्द करण्याचे मान्य केले आहे. लवकरच तो आता भारतामध्ये आल्यानंतर आता आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. डॉक्टर हेडली आणि डॉक्टर राणा या दोघांनी बरीच माहिती पाकिस्तानला दिली होती. त्याचबरोबर आणखी काही लोकांना यामध्ये त्याने माहिती पुरवल्याचा संशय तपास यंत्रणेसह भारताला आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी हे फार मोठी ऐतिहासिक घटना असल्याचे उज्वल निकम म्हणाले आहेत. त्यामुळे या खटल्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात कुणाचा सहभाग होता. हे लवकर समोर येण्याची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी दिली.
कार्यवाही सुरू : दरम्यान 26/11 च्या हल्ल्यातील त्याच्या सहभागावरुन भारताने प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. दरम्यान पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 2008 साली 26/11 च्या दिवशी केलेल्या हल्ल्यातील तहव्वूर राणाच्या सहभागाची चौकशी भारताची राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत आहे. एनआयए राजनैतिक पद्धतीने राणाला भारतात आणत असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सर्व बाबींवर विचार करण्यात आला : कॅलिफोर्नियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट सेंट्रल डिस्ट्रिक्ट न्यायालयात प्रत्यार्पणाची सुनावणी झाली. यूएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सुनावणी देताना प्रत्यार्पण विनंतीच्या समर्थनार्थ आणि विरोधात सादर झालेल्या सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन केले. त्याचा विचार केला. तसेच सुनावणीच्या वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादांचाही विचार या सुनावणीवेळी केला गेला. याविषयीची माहिती 16 मे रोजी 48 पानांच्या न्यायालयीन आदेशात म्हटले आहे.