उज्जैन (मध्य प्रदेश) : Ujjain Rape Case : २७ सप्टेंबरला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बलात्काराची भयंकर घटना उघडकीस आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर सध्या इंदूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता तिच्या आरोग्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. तिच्या शरीरात संसर्ग पसरतोय. मात्र, तिची प्रकृती बरी असून ती उपचारांना प्रतिसाद देत आहे, अशी माहिती तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
तपासासाठी 'एसआयटी' स्थापन : २७ सप्टेंबरला उज्जैनमध्ये बलात्काराची भीषण घटना समोर आली. नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर टाकून दिलं. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासासाठी 'एसआयटी' स्थापन करण्यात आली असून, एकूण २८ जणांचं पथक तपासात गुंतलं आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही आणि इतर पुरावे देखील तपासले जात आहेत. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५ ऑटो चालकांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. संशयित ऑटो चालकाला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना ऑटोच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले होते.
मुलगी रक्तानं माखलेल्या अवस्थेत फिरत होती : उज्जैनमध्ये सोमवारी एक १२ वर्षीय मुलगी इनर रिंग रोडवर रक्तानं माखलेल्या अवस्थेत फिरत होती. याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ही मुलगी अशा अवस्थेत ८ किलोमीटरचा प्रवास करून बडनगर रोडवर पोहोचली. तिथे दंडी आश्रमाचे आचार्य राहुल शर्मा यांनी तिला पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिचं अंग कपड्यानं झाकलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं.