संभाजीनगर येथील सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर : यांना कोणतेच काम नाही. फक्त कोंबडे झुंजवत बसणार. आता म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले. मला एकतरी घटना सांगा मी हिंदूत्व सोडले. जर तुम्ही तशी घटना सांगितली तर मी लगेच घरी बसतो. पुन्हा तोंड दाखवणार नाही असा थेट प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. याचवेळी, तरुणांना नोकरी मिळत नाही. मात्र, काहीजणांना विकतही डॉक्टरेट मिळतात असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच डिलीट पदवी मिळाली त्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
तुम्हाला आम्ही आसमान दाखवू : आजची न्यायालयीन व्यवस्था जर यांच्या हातात गेली तर लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल असे म्हणत ही हुकुमशाही सहन केली जाणार नाही असा इशाराच ठाकरे यांनी दिला आहे. त्याचवेळी काही दिवसांपुर्वी गृमंत्री अमित शाह म्हणाले उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा. परंतु, त्यांना सांगतो आता आम्ही सर्व सोबत आहोत तुम्हाला आम्ही आसमान दाखवू असा थेट प्रतिहल्ला ठाकरे यांनी यावेळी केला आहे. आणि मी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदूत्व सोडले असेल तर तुम्ही मुफ्ती मोहम्मद यांच्याशी युती करून कोणते हिंदूत्व जोपासले होते असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
देशातील सर्वात भ्रष्ट लोक भाजपमध्ये : पुर्वी भाजपच्या व्यासपीठावर सांधूसंत लोक असायचे. आता सगळे संधी साधू बसलेले असतात. ही भारतीय जनता पार्टी नसून भ्रष्ट जन पार्टी आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, देशातील सर्वात भ्रष्ट लोक जे आहेत ते सर्व भाजपमध्ये आहेत असा थेट आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्याचवेळी या लोकांना जे भ्रष्ट आहेत ते आपल्या पक्षात घेणे असे यांचे काम आहे असेही ते म्हणाले आहेत.
दुसऱ्याचा बापही चोरता : आज माझ्या हातात काही नाही. संकट आले तेव्हा आपण सोबत जातो. जेव्हा भाजपवर संकट होते तेव्हा बाळासाहेबंनी तुम्हाला साथ दिली होती. परंतु, बाळासाहेबांनी भाजपची पालखी वाहायला शिवसेनेला जन्म दिला नाही. इथल्या मराठी माणसाला आपला हक्क अधिकार देण्यासाठी शिवसेना निर्माण केली होती. त्याचवेळी आज चिन्ह चोरले, नाव चोरले. मात्र, आता हद्द झाली, त्यांनी माझे वडीलही चोरले. आपल्या वडिलांना काय वाटत असेल त्याचा विचार करा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. त्याचवेळी तुम्हाला (भाजपला) आव्हान आहे तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडणुका लढवा मी माझ्या वडीलांचा फोटो लावून लढवतो असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
बाळासाहेब थोरात :या वज्रमुठ सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज सरकारविरोधी कोणी बोलले की त्याची ईडीकडून चौकशी केली जाते. सुमारे 4 हजार किलोमीटर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी देशभर चालले आणि भारत जोडो यात्रा त्यांनी यशस्वी केली. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्याचे उत्तर तर दिलेच नाही. मात्र, त्यांच्यावर जुने प्रकरण उकरून काढत गुन्हा नोंदवला आणि त्यांची खासदारकी रद्द करण्याचे काम केले असा थेट आरोप थोरात यांनी यावेळी केला आहे. त्याचवेळी आम्ही काद्याला भाव देण्यासाठी आंदोलन केले आणि भाव मिळवून दिला. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांकडे दुरलक्ष करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
अजित पवार :अजित पवार यांनी वज्रमुठ सभेला बोलताना सुरू करताच शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी यावर्षी मुक्तीसंग्रामातील व्यक्तींचा अपमान केला. मुख्यमंत्री फक्त 13 मिनीटे कार्यक्रमाला थांबले. आणि हे फक्त पहिल्यांदाच झाले आहे असेही ते म्हणाले आहेत. सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही. मग तुमच्या विचारांचे सरकार केंद्रात आहे. का भारत रत्न देत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याचवेळी अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, या सरकारने काही मदत केलेली नाही. तसेच, या सरकारचे पायगुन चांगले नाहीत. यांचे सरकार आल्यानंतर उद्योग बाहेर चालले आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा :Opposition Party Meeting: देशभरातील विरोधी पक्षांची अजून एक बैठक, डीएमकेने केले आयोजन