मुंबई :सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. या दौऱ्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरी मशीद वाद आणि बाळासाहेब ठाकरे या विषयावर गंभीर वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपचा समाचार घेतला आहे.
चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे : भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले होते. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनीसुद्धा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेब म्हणाले होते की हे कसले नपुंसक नेतृत्व आहे. आता एक-एक बिळातून बाहेर येत आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
उद्धव ठाकरेंचा मिंधेंवर हल्लाबोल : मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही. शेवटी निकाल कोर्टाने दिला आहे. मिंधेंना बाळासाहेबांचे, शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.