मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित होणार असून शिवसेनेने सुरू केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टद्वारे ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. आता या मुलाखतीचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. 'देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला. मग राष्ट्रवादीने तुमच्या पाठीत काय खूपसलं ? यासाठी तुम्ही राष्ट्रवादी फोडली? असा सवाल या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे विचारताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ :महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षात मोठी उलथापालथ घडली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत वार केल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. आम्ही पाठित खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय खुपसले होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. दिल्लीत रोज मुजरे करणे ही आमची संस्कृती नसल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
माझे सरकार खेकड्यांनी फोडले :माझे सरकार पुरात वाहून गेले नाही, तर ते खेकड्यांनी फोडले अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे गटाने सुरू केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसारित होणार आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून, ही मुलाखत दोन भागात प्रसारित केली जाणार आहे. पहिला आणि दुसरा भाग अनुक्रमे बुधवार आणि गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रसारित केला जाणार आहे.
पॉडकास्टवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची मुलाखत :उद्धव ठाकरे गटाने 'आवाज कुणाचा' नावाचे पॉडकास्ट सुरू केले आहे. यात विविध राजकीय मुद्द्यांवर शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि चर्चेच्या माध्यमातून ठाकरे गट जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. या नव्या पॉडकास्ट सिरीजमध्ये संजय राऊत यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. पॉडकास्ट सध्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आणि शिवसेनेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या आधीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये अभिनेते आदेश बांदेकर यांनी अनिल परब यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची सर्वत्र चर्चा झाली होती.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray interview: उद्धव ठाकरे मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट करणार? शिवसेनेच्या पॉडकास्टचा टिझर रिलिज
- Irshalgad Landslide: इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत: उद्धव ठाकरे