नवी दिल्ली- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला दोन ते १८ वयोगटातील मुलांसाठीच्या वापरला एक्सपर्ट पॅनलने मंजुरी दिली आहे. आता या व्हॅक्सिनला लहान मुलांसाठी डीसीजीआयची मंजुरी मिळवावी लागेल. ती केवळ एक औपचारिकता असल्याचे सांगितले जाते. यासह आणखी तीन व्हॅक्सिन लहान मुलांसाठी येत्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेत येणार आहेत, याचा घेतलेला आढावा.
१) झायडस कॅडिला- ऑगस्ट महिन्यात झायडस कॅडिलाच्या व्हॅक्सिनला १२ वर्षांच्या वर असलेल्या मुलांसाठी मंजुरी देण्यात आली होती. ही डीएनए बेस व्हॅक्सिन आहे. लहान मुलांसाठी मंजुरी मिळालेली ही पहिली व्हॅक्सिन आहे.
अशी आहे झायडसची लस-
झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकावर चाचणी करण्यात आल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माध्यमांना सांगितले होते. केंद्र सरकारच्या जैवऔषधी मोहिमेअंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषद व जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. झायडसची लस ही 2 ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये जास्त काळ टिकते. तर 25 डिग्री सेल्सियस तापमानात कमी काळ टिकते.
२) भारत बायोटेक- या व्हॅक्सिनला दोन ते १८ वयोगटासाठी मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच ही बाजारपेठेत उपलब्ध होईल.
कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी लस -
देशात 16 जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण सुरू असताना कोव्हॅक्सिनचा वापर करण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी असलेली कोरोना विरोधातील लस आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
भारत बायोटेक इतर कंपन्यांना देणार लसीचा फॉर्म्युला देणार -
केंद्र सरकार आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक इतर कंपन्यांना कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी आमंत्रित करण्यास तयार आहे, असे एनआयटीआय आयुक्त सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी गुरुवारी सांगितले. ज्या कंपन्या लस उत्पादनासाठी सक्षम आणि इच्छूक आहेत त्यांनी पुढे यावं असंही आवाहन पॉल यांनी केलं. देशभरातील लसीकरण केंद्रांवर कोरोना लसीच्या कमतरतेच्या अनेक बातम्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
३) सिरम इन्स्टिट्यूटची नोव्होवॅक्स -सात ते ११ वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यासाठी गेल्या महिन्यातच डीसीजीआयची मंजुरी मिळाली होती. येत्या काही महिन्यात ही व्हॅक्सिनही बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पुनावाला म्हणाले, सरकार आम्हाला प्रयत्न करत आहे. आम्हाला कोणतीही आर्थिक अडचण नाही. सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभारी आहोत. लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार आहे. हे डीजीसीआयच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले. हा डोस दोन वेळेचा असणार आहे. त्याची किंमत लाँचिंगवेळी निश्चित केली जाणार आहे.
अदार पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. कोव्हिशिल्डच्या पुरवठ्याकरिता ही भेट फलदायी ठरल्याचे आरोग्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
४) बायोलॉजिकलची कोरबेव्हॅक्स- ५ वर्षांच्या वरील मुलांवर चाचणीसाठी या व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे. ही लहान मुलांसाठीची चौथी व्हॅक्सिन असेल. ही व्हॅक्सिनही येत्या काही महिन्यात बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.