श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोएबा संघटनेचा टॉप कमांडर इशफार डार उर्फ अबू अकरम याचा समावेश आहे. दरम्यान, अकरम काश्मीर घाटीत चार वर्षांपासून दहशतवादी कारवायामध्ये सक्रिय होता.
सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात काल रविवारपासून चकमक सुरू होती. यात लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एक टॉपच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले होते. दहशतवादी रात्रीचा फायदा घेऊन पळून जाऊ नये, यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.
पोलिसांनी सांगितलं की, चक ए सादिक खान परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला वेढा घालत शोधमोहिम हाती घेतली. जवांनानी प्रत्येक घरात शोध सुरू केला. तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला.