अमृतसर : अमृतसरचे दोन भटके कुत्रे आता थेट कॅनडाच्या भूमीवर पाय ठेवणार आहेत. अमृतसर शहरातील 2 बेवारस कुत्र्यांना विशिष्ट परिस्थितीत कॅनडाला जाण्याची संधी मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅनिमल वेल्फेअर अँड केअर सोसायटीच्या डॉ. नवनीत कौर, लिली आणि डेझी नावाच्या दोन भटक्या कुत्र्यांना कॅनडाला घेऊन जात आहेत. तेथील रहिवासी असलेल्या ब्रेंडा नावाच्या महिलेने या कुत्र्यांची मागणी केली आहे. आता त्यांचे पासपोर्ट बनवले जात आहेत. प्राण्यांना व्हिसा नसला तरी त्यांना पासपोर्टशिवाय परदेशात घेऊन जाता येत नाही. याशिवाय काही अटी आहेत ज्या डॉ. नवनीत कौर पूर्ण करत आहेत.
कुत्रे कॅनडाला का जात आहेत? :याबाबत बोलताना डॉ. नवनीत कौर म्हणाल्या की, त्या अमृतसरचे दोन कुत्रे, लिली आणि डेझीला कॅनडाला घेऊन जात आहेत. ब्रेंडा या कॅनेडियन महिलेने लिली आणि डेझी यांना दत्तक घेतले आहे. या कुत्र्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. विशेष म्हणजे, या आधीही त्यांनी 6 कुत्रे विदेशात नेले आहेत. त्यापैकी दोघे त्यांच्यासोबत अमेरिकेत राहतात.
अॅनिमल वेलफेअर अँड केअर सोसायटीची स्थापना कशी झाली? : त्या पुढे म्हणाल्या की, 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जगात लॉकडाऊन होते, तेव्हा त्यांनी अॅनिमल वेल्फेअर अँड केअर सोसायटी म्हणजेच AWCS संस्था स्थापन केली. सुखविंदर सिंग जॉली यांनी अमृतसरमध्ये या संस्थेचा कार्यभार स्वीकारला आणि संस्थेचे काम पुढे नेले. डॉ. नवनीत यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून हे कुत्रे त्यांच्यासोबत राहत आहेत. त्या म्हणाल्या की, लिली आणि डेझी यांना कोणीतरी वाऱ्यावर सोडले होते. दोघांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
'आपली विचारसरणी बदलली पाहिजे' :डॉ. नवनीत म्हणाल्या की, आपल्याला भटक्या कुत्र्यांबद्दलची आपली विचारसरणी बदलावी लागेल. आपण रस्त्यावरील कुत्र्यांना पाळत नाही आणि त्यांना मूळ रहिवासी मानत नाही. मात्र हेच कुत्रे कॅनडामधील लोक आनंदाने दत्तक घेतात. कारण भारतीय कुत्र्यांची जात अधिक मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारी असते.
हेही वाचा :
- National Pet Day 2023 : राष्ट्रीय पाळीव प्राणी आज साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास