जम्मू-काश्मीर -पुंछ जिल्ह्यातील दहशतवादविरोधी कारवाईत गुरुवारी एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक सैनिक शहीद झाले आहेत. ही माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली. पुंछ जिल्ह्यात दहशतादविरोधात लढा देताना गेल्या पाच दिवसांत सात जवान हुतात्मा झाले आहेत.
जम्मू -काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपसह (एसओजी) भारतीय लष्कराच्या जवानांनी घनदाट जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भींबर गली ते सुरणकोटे दरम्यान महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहिम सुरू केली आहे. तर दहशतवाद्यांकडून सामान्यांना लक्ष केले जात आहे. काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या नागिरकांना लक्ष्य केले होते.