पणजी- उत्तर गोव्यात मागच्या लॉकडॉऊन पासून गोव्यात अडकलेल्या दोन परदेशी तरुणी मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील 24 वर्षीय तरुणीने घरात आत्महत्या केली आहे, तर अन्य एका घटनेतील एका 34 वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. लॉक डाऊनमुळे त्या दोघींही गोव्यात अडकून पडल्या होत्या. गोव्यातील शिवोली आणि मोरजी या समुद्रकिनारी भागात या दोघींचे मृतदेह आढळून आले आहेत.
गोव्यात दोन परदेशी तरुणींचे आढळले मृतदेह, एकीने घेतला होता गळफास - रशियन तरुणीची आत्महत्या
गोव्यामध्ये दोन रशियन तरुणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. यातील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर दुसरीचा मृतदेह आढळून आला आहे.
यामृतामधील २४ वर्षीय अलेक्झांड्रा (alexandra) ही आपल्या प्रियकरासोबत ओशेल येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. तिचा प्रियकर गुरुवारी सकाळी आपल्या मित्राकडे मोरजी येथे गेला असता, संध्याकाळी परत आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. बाल्कनीत जाऊन छतावरून घरात उतरला असता, त्याला प्रेयसी मृतावस्थेत लटकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने सुरीने दोरी कापून तिला शिवोली रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत तरुणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती त्यातून तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
34 वर्षीय तरुणी मृतावस्थेत-
दरम्यान गुरुवारी संध्याकाळी एक 34 वर्षीय रशियन तरुणीच शिवोली येथे मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. दोन्ही घटनांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले आहेत. या दोघीही लॉकडाऊनमुळे गोव्यातच अडकून पडल्या होत्या अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.