एटा -उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात एका लग्नाची विचित्र घटना समोर आली आहे. कोतवाली देहात पोलीस स्टेशनमधील एका गावातील नवरीच्या घरी दोन वराती आल्या. पहिल्या वरातीतील नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हार टाकला. तर दुसऱ्या नवरदेवासोबत सात फेरे घेतले. या गोंधळामुळे पहिल्या नवरदेवाकडील मंडळी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि नवरीच्या वडील आणि काकाला ताब्यात घेतले.
असे आहे प्रकरण -
एका लग्नाची गोष्ट : बोहल्यावर दोन नवरदेव एक नवरी कोतवाली देहात पोलीस ठाण्याअंतर्गत एक गाव आहे. त्याठिकाणी गुरुवारी नवरदेवाकडील वरात आली. पहिली वरात नरौरा गावातील तर दुसरी वरात जिन्हैरा गावातील होती. एकाच वधू मंडपात दोन वराती पाहून गावातील लोकही चक्रावले. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या वरातीतील नवरदेवाने नवरीला हार घातला. मात्र त्यानंतर नवरीकडील नातेवाईकांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर दुसरी वरात त्याठिकाणी पोहोचली आणि त्या नवरदेवासोबत लग्न लावले. लग्न लावून नवरीला जिन्हैरा गावात घेऊन गेले. मात्र या लग्नामुळे पहिल्या वरातीतील मंडळी नाराज झाली. त्यामुळे ते घरी जाण्याऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. नवरदेवाने मुलीच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वडील आणि काकाला ताब्यात घेतले आहे. तसेच नवरदेवाकडील मंडळीने नवरीला दिलेले सर्व सामान परत करण्याची मागणी केली आहे. नवरीच्या वडीलांनी मुलीचे दोन ठिकाणी लग्न पक्के केल्याची माहिती आहे.
कोतवाली देहातचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार सिंह यांनी सांगितले, "या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दोन ठिकाणी लग्न पक्के केले होते. पहिल्या वरातीतील नवरदेवाने हार घातला तर दुसऱ्यासोबत लग्न लावून दिले. लोभी वृत्तीमुळे मुलीच्या वडीलांनी हे कृत्य केले. काही नातेवाईकांना ताब्यात घेतले असून घटनेची चौकशी सुरू आहे".
त्याचप्रमाणे मुलीच्या वडीलांनी म्हटले, "पहिला नवरदेव मुलीला पसंत नव्हता. त्यामुळे दावत घ्यायला आलेल्या नातेवाईकातील दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. पहिल्या वरातीतील मुलाला मला आणि मुलीला दाखवण्यात आले नव्हते. त्यामुळे मुलीने लग्नास नकार दिला. तर दुसऱ्या नवरदेवाला मुलगी अगोदरपासून ओळखत होती".