अहमदाबाद (गुजरात) -गुजरातमध्ये मोठी कारवाई करत सीमा सुरक्षा दलाने (BSF) कच्छ परिसरातून दोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक केली आहे. हे मच्छिमार भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, असे सांगण्यात येत आहे. दोघांना हरामी नाल्याजवळ अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाला रविवारी सकाळी पाळत ठेवण्याच्या ऑपरेशन दरम्यान हरामी नाल्याजवळ काही हालचाल दिसली. काही मच्छिमारांना सहा बोटी घेऊन येताना दिसताच हवाई दलाने तातडीने बीएसएफला सूचना दिली.
हवाई दलाने दिलेल्या माहितीनंतर लगेचच बीएसएफकडून संपूर्ण परिसरात विशेष मोहीम सुरू करण्यात आली. बीएसएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 900 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या हरामी नाला परिसरात तातडीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत बीएसएफ जवानांनी दोन पाकिस्तानी मच्छिमारांना पकडले असून कारवाई सुरू आहे. यासीन शेख (35) आणि मोहम्मद शेख (25) अशी या मच्छिमारांची नावे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघेही पाकिस्तानातील सुजावल जिल्ह्यातील झिरो पॉइंट भागातील आहेत.