सरायकेला (झारखंड) : सरायकेला येथे काल रात्री झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झालेत. जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियन यांच्या संयुक्त कारवाईत पोलिसांना यश आले आहे. कुचई नक्षलग्रस्त भागात 1 कोटीचे बक्षीस असलेला नक्षलवादी अनल दा याच्या पथकातील दोन नक्षलवाद्यांना ठार केले.
काल रात्री नक्षलग्रस्त कुचई भागात जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केली. ज्यामध्ये पोलिसांची नक्षलवादी अनल दा पथकासोबत तासभर चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात पोलिसांनी दोन माओवाद्यांना ठार केले. यामध्ये एका महिला नक्षलवादीचाही सहभाग आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी काही शस्त्रांसह दोन एसएलआर रायफल जप्त केल्या आहेत. चकमक आणि नक्षलवाद्यांच्या खात्म्याला झारखंड पोलीस मुख्यालयाने दुजोरा दिला आहे.