गुजरात :गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात खोकल्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करणार्या एका 'स्वयंभू डॉक्टराने' लाल-गरम लोखंडी सळाईने चटके दिल्यामुळे एका दोन महिन्यांच्या चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एकीकडे विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असताना, साध्या खोकल्यासारख्या आजारावर देखील आजही नागरिक चुकीच्या गोष्टींना बळी पडत असल्याचे दिसून येते.
अशी घडली घटना :सामान्य रुग्णालयाचे डॉ. जय बदियानी यांनी माध्यमांना सांगितले की, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 9 फेब्रुवारी रोजी मुलीला रुग्णालयात आणण्यात आले होते. 'तिला आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्ट प्रणालीवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान, आम्हाला आढळले की, तिच्या फुफ्फुसांचे कार्य मंदावले आहे. यामुळे तिची गुंतागुंत वाढली आहे. पोरबंदर येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल मुलीची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिली माहिती : पोलीस उपअधीक्षक सुरजीत मेहेदू यांनी सांगितले की, बनावट डॉक्टरला रविवारी अटक करण्यात आली आणि डॉक्टरच्या आणि मुलाच्या आईविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली. मुलीला शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. ती निरीक्षणाखाली असून; तिची प्रकृती आता स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. मेहेदू म्हणाले की, 'मुलीला एका आठवड्यापूर्वी खोकला आणि कफ झाला होता आणि तिच्या पालकांनी घरी स्थानिक उपाय करून पाहिले, पण आराम मिळाला नाही. त्यानंतर मुलीच्या आईने तिला देवराजभाई कटारा नावाच्या एका व्यक्तीकडे नेले.