शेजाऱ्यांच्या प्रतिक्रिया वाराणसी Varanasi News : वाराणसीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे. इथं दोन मुली जवळपास वर्षभर आईच्या मृतदेहासोबत घरातच राहत होत्या. त्यांच्या आईचं एक वर्षापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळं त्यांच्या आईच्या शरीराचा सांगाडा झाला होता. मात्र, मुलींनी आईवर अंतिम संस्कार केले नव्हते.
घरातून सांगाडा ताब्यात : गेल्या अनेक दिवसांपासून मुली घराबाहेर न पडल्यानं शेजाऱ्यांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक घरी पोहोचले. त्यावेळी मृत महिलेचा सांगाडा पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याबात त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घरातून सांगाडा ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. सध्या पोलीस मृत महिलेच्या दोन्ही मुलींची चौकशी करत आहेत.
ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवला मृतदेह : हे संपूर्ण प्रकरण लंके पोलीस स्टेशन परिसरातील घाट चौकी अंतर्गत येणाऱ्या मदरवनशी येथील आहे. पोलिसांनी उषा त्रिपाठी नावाच्या 52 वर्षीय महिलेचा मृतदेह घरातून ताब्यात घेतला. हा मृतदेह गेल्या एक वर्षापासून घरात पडून होता. तेव्हापासून मृताच्या दोन्ही मुली घरात राहत होत्या. 27 वर्षांची मोठी मुलगी पल्लवी त्रिपाठी पदव्युत्तर आहे. तर, धाकटी मुलगी वैश्विक त्रिपाठी 17 वर्षांची असून ती 10वी पास आहे.
प्रकृती बिघडल्यानं निधन : घरात ठेवलेल्या मृत उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहाचा जवळपास सांगाडा झाला होता. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून एका खोलीत ठेवण्यात आला होता. मुलींनी सांगितलं की, आई उषा त्रिपाठी यांचं 8 डिसेंबर 2022 रोजी प्रकृती बिघडल्यानं निधन झालं होतं. आमचे वडील खूप वर्षांपूर्वीच घर सोडून गेले होते.
असं उघड झालं रहस्य : काही दिवसांपासून दोन्ही मुली घराबाहेर येत नव्हत्या. त्यामुळं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मिर्झापुरात राहणारे उषा त्रिपाठी यांचे मेहुणे धर्मेंद्र चतुर्वेदी यांना याची माहिती दिली. यानंतर धर्मेंद्रसह त्यांची पत्नी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच पल्लवी, वैश्विक या दोन्ही मुली आई उषा त्रिपाठी यांच्या मृतदेहासोबत एका खोलीत बसलेल्या दिसल्या. हे पाहून नातेवाईक धर्मेंद्र चतुर्वेदी यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ याबाबत लंके पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पाहताच दोन्ही मुलींनी एकच गोंधळ घातला. कसाबसा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणासाठी पाठवला. तसंच दोन्ही मुलींची चौकशी सुरू केली आहे.
दुर्गंधी टाळण्यासाठी अगरबत्तीचा वापर : चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, उषा त्रिपाठी यांचा मृत्यू तब्येत बिघडल्यानं झाला. त्यांचा नवरा फार पूर्वीच घर सोडून गेला आहे. अशा परिस्थितीत आईच्या मृत्यूनंतर साधनसंपत्तीअभावी दोन्ही मुलींनी मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये, म्हणून मुलींनी अगरबत्ती, रूम फ्रेशनचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा -
- RSS मुख्यालय, नागपूर विमानतळाजवळ ड्रोन उड्डाण करण्यास बंदी
- पार्टी भोवली! पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पार्टी करणारे चार पोलीस निलंबित
- मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; सिंहगड इन्स्टिट्यूट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर हडपली