नवी दिल्ली : मणिपूरमधील दोन महिलांची विविस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुधवारी मणिपूरच्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ही घटना 4 मे रोजी घडली असून याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.
सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप :याप्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करण्यात आले होते. त्यातील एक 20 आणि दुसरी 40 वर्षांची होती. जमावाने या महिलांना विविस्त्र करीत रस्त्यावर धिंड काढली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक दोन महिलांना विवस्त्र करून त्यांना शेताकडे ओढताना दिसत आहेत. 18 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत पीडितेने विवस्त्र करून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा :मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात 4 मे रोजी दोन मणिपूरच्या महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली. याप्रकरणी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी 19 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात दिली आहे. 4 मे रोजी अज्ञात सशस्त्र समाजकंटकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली. याप्रकरणी थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे के. मेघचंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
कठोर कारवाईचे आदेश : पंतप्रधान मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.