नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची स्थिती बिकट असताना सोशल मीडियावर काही बनावट बातम्या, माहिती शेअर केली जात असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनांनुसार ट्विटरकडून अनेक ट्विट काढून टाकण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ट्विटद्वारे बनावट बातम्यांचा, माहितीचा प्रसार केला जात होता. लसीकरणासंदर्भात विनाकारण खोटी माहिती पसरवली जात होती.
ट्विटरच्या प्रवक्त्याने काही ट्वीट काढून टाकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारत सरकारच्या कायदेशीर विनंतीला उत्तर म्हणून ही कारवाई केली गेली आहे. कोविड-19 संबंधित चुकीच्या माहितीवर उपाय म्हणून त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि मानवी समीक्षा वापरत आहोत. या धोरणानुसार तक्रार मिळाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने माहितीचा आढावा घेतो, जर त्यात नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाईल. कोणतेही ट्विट डिलीट करण्यापूर्वी वापरकर्त्याला ईमेलद्वारेही त्याविषयी माहिती दिली जाते, असे ट्विटर प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -पीएम केअर फंड : देशातील सरकारी रुग्णालयात कार्यन्वित होणार 551 ऑक्सिजन निर्मिती प्लांट