नवी दिल्ली - नवीन माहिती तंत्रज्ञान नियमानुसार निवासी तक्रार निवारण अधिकारी म्हणून टि्वटरने विनय प्रकाश यांची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे टि्वटर आणि केंद्र सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते.
ट्विटरच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, विनय प्रकाश कंपनीचे तक्रार निवारण अधिकारी (आरजीओ) असणार आहेत. वेबसाइटद्वारे युजर्स त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
यापूर्वी, ट्विटरने धर्मेंद्र चतूरला आयटी नियमांनुसार भारतासाठी अंतरिम निवारण तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. गेल्या महिन्यात चतूर यांनी राजीनामा दिला होता. ट्विटरचे भारतात सुमारे 1.75 दशलक्ष युजर्स आहेत.
काय आहे सोशल मीडिया नियमावली?
- सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी भारतात एक तक्रार निवारण व्यासपीठ करावं आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तक्रार 24 तासांत नोंद करावी आणि 15 दिवसांत तिचं निवारण करावे. संबंधित व्यासपीठ 24 तास सुरू असावं.
- प्रत्येक महिन्याला किती तक्रारी आल्या आणि किती तक्रारींवर कारवाई करण्यात आली, यासंदर्भातील एक अहवाल जमा करावा.
- आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावं लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं.
- एखाद्या युजरचे कंटेट हटवण्यात आले. तर यावेळी संबंधित युजरलाही आपली बाजू मांडण्याचा अधिकार द्यावा.