नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची सत्ता येत असताना त्याचा फटका भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयालाही बसला आहे. या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाले आहे. याबाबतची माहिती अफगाणिस्तान राजदूत कार्यालयाच्या माध्यम सचिव अब्दुलहक आझाद यांनी सांगितले.
तालिबानींनी काबुलवर रविवारी कब्जा मिळविला आहे. त्यापूर्वीच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे पदावरून पायउतार झाले. त्यानंतर त्यांनी देशातून पळ काढला आहे. त्यावर अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयाच्या ट्विटरवरून घनी यांच्यावर टीका करण्यात आली. त्याबाबत अफगाणिस्तान राजदूत कार्यालयाच्या माध्यम सचिव अब्दुलहक आझाद म्हणाले, की @AfghanistanInIN हा ट्विटर हँडल हाताळणे अशक्य झाले आहे.
मित्राने हा स्क्रीनशॉट पाठविला आहे. ट्विटरचे लॉग इनचा प्रयत्न करूनही शक्य होत नाही. हॅक झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा-तालिबानने जिंकला अफगाणिस्तान ... संयुक्त राष्ट्रसंघाने आज बोलाविली आपात्कालीन बैठक
दरम्यान, काबुलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यावसायिक उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. विमानतळावर लोकांनी कर्दी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. एअर इंडियाचे 129 प्रवासी असलेले विमान अफगाणिस्तानवरून नवी दिल्लीला रविवारी पोहोचले. अफगाणिस्तानमधील स्थितीवर जवळून देखरेख करण्यात येत असल्याचे सरकारमधील सूत्राने सांगितले. दरम्यान, भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.