नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे केंद्र सरकार आणि ट्विटर आमने-सामने आलेले आहेत. आता यातच ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकली आहे.
मोहन भागवत यांनी आपल्या टि्वटरखात्यावरून एकही टि्वट न केल्यामुळे ब्लू टिक हटवण्यात आले असावे, असे म्हटलं जात आहे. तसेच यापूर्वी टि्वटरने उराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवली होती. केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने खात्यावरील ब्लू टिक पुन्हा सक्रीय केली आहे.
2019 मध्ये मोहन भागवत यांचा टि्वटरवर प्रवेश
मोहन भागवत यांनी 2019 मध्ये टि्वटर खाते सुरू केले होते. आतापर्यंत त्यांनी आपल्या टि्वट खात्यावरून एकही टि्वट केले नाही. मोहन भागवत यांच्यासह आरएसएस नेता सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार यांच्या वैयक्तिक खात्यावरून ब्लू टिक हटवली आहे.
टि्वटरचे धोरण...
ट्विटरच्या नियमांप्रमाणे, खाते सक्रिय ठेवावे लागते. तसेच प्रोफाईल अपडेट करणे करणे गरजेचे असते. जर अकाउंट खूप दिवसांपासून अॅक्टिव नसेल, तर ब्लू टिक हटवली जाते. तसेच जर तुमच्याकडून टि्वटर पॉलिसीचे उल्लंघन होत असेल, तरीही तुमच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवली जाण्याची शक्यता असते.
हेही वाचा -अपरा एकादशी 2021: जाणून घ्या जल क्रीडा एकादशीचे शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व