छिंदवाडा (मध्य प्रदेश) : जन्मापासून त्या दोघी एकत्र वाढल्या. आता लग्नानंतर देखील एकत्रच नांदतील! एकत्र वाढलेल्या मुली एकमेकांपासून वेगळ्या होतील, याची चिंता आई-वडील आणि कुटुंबीयांना सतावत होती. पण म्हणतात ना की, लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली जाते. अगदी तसाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये घडला आहे. येथे दोन जुळ्या भावांचे नाते जुळ्या बहिणींशी जोडले गेले आहे. छिंदवाडा येथील धिमरी परिसरात जुळ्या बहिणींच्या लग्नाची मिरवणूक घेऊन जुळे भाऊ आले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. जुळ्या वधू-वरांनी मिळून वरमाला आणि सात फेऱ्यांसह लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले.
दोन्ही जुळ्यांमध्ये फक्त 5 मिनिटांचा फरक : या लग्नाबद्दल नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. जुळ्या जोडप्यांचे लग्न पाहण्यासाठी दुरुन लोक पोहोचले होते. लता आणि लक्ष्मी या जुळ्या बहिणींचा विवाह नागपूर येथील अमन आणि ऋषभ यांच्याशी झाला. नागपूरचे जुळे वर छिंदवाड्यात लग्नाची मिरवणूक घेऊन पोहोचले. मिरवणूक पोहोचल्यावर लताने अमनला आणि लक्ष्मीने ऋषभला हार घातला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दोन बहिणींमध्ये फक्त 5 मिनिटांचा फरक आहे. तर दोन भावांमध्ये देखील वयाचा तेवढाच फरक आहे. तसेच दोन्ही जुळ्यांच्या सवयी आणि दिसणे देखील सारखेच आहे.