कानपूर (उत्तरप्रदेश): नुकतेच तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. या आपत्तीत 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण जगात भूकंपाच्या अंदाजाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही अशाच प्रकारचा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज आहे.
का होतातभूकंप: प्रा. जावेद मलिक यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले की, जमिनीत खूप खोलीवर टेक्टोनिक प्लेट्स आहेत. त्यांची हालचाल, एकमेकांवर आदळणे आणि चढ-उतार यामुळे प्लेट्समध्ये सतत तणावाची स्थिती निर्माण होते. नंतर त्याचे रूपांतर ऊर्जेत होते आणि त्यामुळे सर्वसामान्यपणे भूकंपाचे धक्के बसतात. जर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सोडली गेली, तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात किंवा त्यांची तीव्रता खूप जास्त असते. त्यांनी सांगितले की, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती.
हा असू शकतो केंद्रबिंदू:आयआयटीचे प्रोफेसर जावेद मलिक म्हणाले की, लवकरच भूकंपामुळे देश हादरण्याची शक्यता आहे. मात्र आपल्याला घाबरण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.