रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. टीएस सिंहदेव यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून टीएस सिंहदेव यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. टीएस सिंहदेव हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि कार्यक्षम प्रशासक आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सेवेचा राज्याला मोठा फायदा होणार आहे'.
छत्तीसगडमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका : छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल टीएस सिंहदेव यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'आम्ही यासाठी तयार आहोत. महाराज साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा'. छत्तीसगडमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेच्या 90 पैकी 68 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपची 15 जागांवर घसरगुंडी झाली होती. विजयानंतर काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले. मात्र, तेव्हापासूनच भूपेश बघेल आणि टीएस सिंग देव यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी काँग्रेसने टीएस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्री बनवून मोठी खेळी केली आहे.