महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कॅपिटोल हिल हिंसाचार : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग सुरू

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ऐतिहासिक दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई आजपासून (मंगळवार) सुरू झाली आहे. ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. यास ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Feb 9, 2021, 12:12 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ऐतिहासिक दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई आजपासून (मंगळवार) सुरू झाली आहे. ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. यास ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले आहे. 'देशाविरोधात बंडाळी' असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून साक्ष देण्यास नकार दिला आहे. पद सोडल्यानंतरही महाभियोगाची कारवाई होणारे ट्रम्प हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

सिनेट सभागृहाचे हजर राहण्याचे आदेश -

अमेरिकन संसदेतील सिनेट सभागृहाने ट्रम्प यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ट्रम्प यांनी सभागृहात साक्ष देण्यास नकार दिला आहे. माझ्या विरोधात सुरू असलेला खटला असंविधानिक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात एक मजबूत खटला उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. जर ट्रम्प सिनेट सभागृहात साक्ष देण्यास हजर राहिले नाही तर त्यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यास मदत होईल, असे म्हटले आहे. सिनेट सभागृहाने ट्रम्प यांना सभागृहात हजर राहण्यासाठी अधिकृत पत्र पाठवले आहे.

ट्रम्प यांच्या सल्लागाराकडून अधिकृत उत्तर -

ट्रम्प यांचे सल्लागार जेसन मिलर यांनी ट्रम्प यांची बाजू मांडली आहे. असंविधानिक खटल्यात डोनाल्ड ट्रम्प कोणतीही साक्ष देणार नाहीत. ट्रम्प यांच्या वकीलांनीही सभागृहाचा आदेश धुडकाऊन लावला आहे. हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे ते म्हणाले आहेत. वकील आणि विरोधक ट्रम्प यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत.

संसदेवर हल्ल्याची घटना काय आहे?

६ जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी संसदेवर चाल केली होती. आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलकांनी संसदेचे बॅरिकेडस् तोडत आत प्रवेश मिळवला. तसेच आतील सामानाची तोडफोड केली होती. संसद सदस्यांना बाकाखाली लपण्याची वेळ आली. आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. बायडेन यांच्या निवडणुकीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे अधिवेशन भरले होते. त्यावेळी ट्रम्प समर्थकांनी याचा विरोध केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details