कोइम्बतूर(तामिळनाडू) - भारतात झोपड्यांमुळे फक्त समाजातील आर्थिक विभाजनच दिसत नाही, तर जातियवाद किती खोलपर्यंत रुजलाय हेही दिसून येते. समाजात कोणत्याही प्रकारची हिंसा झाल्यास सर्वप्रथम झोपड्या जाळल्या जातात. कोणत्याही सरकारसाठी झोपडीमुक्त राज्य हा समान समाज बनवण्याचा सुरुवातीचा प्रयत्न असतो.
आपण सर्व आणि राजकारणीही मान्य करतात, की झोपडी गरीबीचे प्रतिक आहे. कोणी विदेशातून मोठे व्यक्ती येणार असतील तर या झोपड्या लपवण्याचा प्रयत्न होतो. त्यासाठी भिंती बांधल्या जातात. मात्र, या झोपड्या हटवून त्याठिकाणी पक्की घरे बांधण्याचा विचार कोणाच्याच मनात येत नाही. आपल्या देशातील एका व्यक्तीने हे करुन दाखवले आहे. या व्यक्तीच्या प्रयत्नातून त्याचे गाव झोपडीमुक्त झाले आहे.
सर्व मुलभूत सुविधा -
कोइम्बतूर जिल्ह्यातील मेट्टूपालयमजवळ तामिळनाडूच्या ओदानथुराई गावात प्रवेश करताच पिण्याचे पाणी, वायू आणि सौरऊर्जेचे संच लावलेली एकसारखी घरे आपल्याला दिसून येतात. ही किमया आहे येथील पंचायतीचे माजी अध्यक्ष शनमुगम यांची. येथील गावासाठी त्यांनी पवनचक्की फार्म बनवले आहे. ज्यामधून दरवर्षी ८ लाख युनिट वीज तयार होते. या विजेचा वापर प्रामुख्याने गावातील लोकांसाठी होतो. तर उर्वरित वीज राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीला विकली जाते. 'आत्मनिर्भर' असणे म्हणजे काय हे या गावाकडे पाहून आपल्याला कळते.
गावात बांधली पर्यावरणपूरक घरे -
शनमुगम यांनी ग्रामस्थांसाठी पर्यावरणपूरक ८५० घरे बांधली. त्यासाठी त्यांनी अतिक्रमण केलेली जमीन परत घेतलीच, शिवाय स्वतःकडे असलेली २ एकर जमीनही दान केली. कोणताही गाजा-वाजा न करता त्यांनी गावाला झोपडीमुक्त करत पक्की घरे बांधली. खेड्यांचा विकास होईल, तेव्हाच आपला देश महासत्ता बनेल आणि खेड्यांना मागे सोडणं हे विकासावर मर्यादा आणेल, असे शनमुगम मानतात.