अमरावती ( आंध्र प्रदेश ) : इस्लामिक कायद्याच्या निकषांच्या विरोधात एकाच वाक्यात तीन वेळा तलाकचा उच्चार करता येत नाही. तलाकनामा लिहिला असला तरी तो अवैध ठरतो, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा तलाकनाम्यामुळे ( Talaqnama ) विवाह रद्द होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इस्लामिक कायद्याच्या नियमांनुसार, मध्यस्थांनी पती-पत्नी दोघांच्या वतीने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते शक्य नसताना, वाजवी कारणांसाठी तीन तलाक ( Triple Talaq ) वेगवेगळ्या वेळी उच्चारले जावेत आणि त्या तीन प्रकरणांमध्ये आवश्यक वेळ (वेळेचे अंतर) असावे, असे स्पष्ट केले आहे. पतीने-पत्नीला तलाकची माहिती दिली पाहिजे.
भरणपोषणात अधिकार : सुप्रीम कोर्टाने 'शायरा बानो' प्रकरणात ( Supreme Court Ruled in Shyara Bano Case ) तीन तलाक एकाच वेळी सांगून विवाह रद्द करणे असंवैधानिक आहे, असा निकाल दिला होता. सध्याच्या प्रकरणात, तलाकनामा नोंदणीकृत पोस्टाने पाठवण्यात आला होता आणि फेटाळण्यात आला होता, असे पतीने सांगितल्याशिवाय अन्य कोणताही पुरावा सादर केला गेला नाही. एका वाक्यात तीन वेळा तलाक म्हणणे आणि ते लिखित स्वरूपात पाठवणे अवैध असल्याचे त्यात म्हटले आहे. या संदर्भात, न्यायालयाने स्पष्ट केले की, ती एक पत्नी आहे आणि ती तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याने तिला भरणपोषणाचा अधिकार आहे.
घटस्फोटीत मुस्लीम महिला पोटगीसाठी पात्र : घटस्फोटीत मुस्लिम महिलादेखील CRPC च्या कलम 125 अन्वये तिच्या पतीकडून आयुष्यभर पोटगी/भरणपोषणासाठी पात्र आहे (जोपर्यंत तिने पुनर्विवाह केला नाही). जर तिला योग्य राहणीमान भत्ता दिला गेला, तर ती शांत जीवन जगू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविनाथ तिल्हारी यांनी नुकताच या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला.