नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील सिमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले.
देशातील सर्व जिल्ह्यात श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन करतेवेळी जीव गमावलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण केले जाईल, असे शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी म्हणाले. सिंधु, टीकरी व गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलन स्थळी श्रद्धांजली सभा पार पडल्या. या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.
बुराडींच्या निरंकारी समागम मैदानात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. सिंघू, औचंदी, पियाउ मनियारी, सभोली आणि मंगेश बॉर्डर बंद असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू...
शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघात, आजार आणि थंडीमुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले. ४० मुख्य शेतकरी संघटना आणि सुमारे ५०० इतर शेतकरी संघटनांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या २४ दिवसांपासून बसून आहेत.