हैदराबाद :डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर बायडेन यांना अमेरिकी नागरिकांनी कौल दिला. यामध्ये ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर, त्याबाबतचे कित्येक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिल्यामुळे ट्रम्प यांचा पराभव झाला, अशा आशयाचे, तर ट्रम्प आता सत्तेत परत येण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार, अशा आशयाचेही कितीतरी मीम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पाहूयात यातील काही मीम्स..
मोदींवर खापर..
पंतप्रधान मोदी हे आंतरराष्ट्रीय पनवती आहेत, आणि ते ज्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात त्यांची सत्ता जाते, अशा आशयाचे एक मीम सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच हे मीम तयार करण्यात आले होते. इतर राष्ट्राध्यक्षांचा पराभव झाला, आता ट्रम्प यांचे काय होईल? असे यात विचारले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांचाही खरंच पराभव झाल्यामुळे आता हे मीम व्हायरल होत आहे..
ट्रम्प राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला..
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर, पुरेसे संख्याबळ नसतानाही फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत, पहाटेच आपले सरकार स्थापन केले होते. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्पही सरकार स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत, असेही एक मीम सध्या व्हायरल होत आहे.
चहापत्ती संपली..
ट्रम्प आपल्याकडे चहापानाला येतील, याचा अंदाज राज्यपालांना आधीच आला आहे. त्यामुळे आपल्याकडची चहापत्ती संपल्याचे राज्यपाल कोश्यारी सांगत आहेत, असेही एक मीम एका ट्रोलरने तयार केले आहे.
अमित शाह तर, बिहारमध्ये बिझी..
एखाद्या राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दरारा तर सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच, डोनाल्ड ट्रम्पही अमित शाहांना आपली मदत करण्याची विनंती करत आहेत, मात्र शाह सध्या बिहार विधानसभा निवडणुकीत व्यग्र असल्यामुळे त्यांची मदत करण्यास नकार देत आहेत, हा मीम तर देशभरात प्रसिद्ध होतो आहे.