पणजी (गोवा)- तौक्ते चक्रीवादळाचा फटका गोव्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे मडगावहून थिवीमकडे जात असताना या मार्गावर एक भले मोठे झाड कोसळल्याने मध्येच ही रेल्वे थांबवावी लागली आहे. हे झाड कोसळायचे वेळीच लक्षात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गोव्यात सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
गोव्यातील चक्रीवादळाचा नेत्रावती एक्सप्रेसला फटका
गोव्यातील चक्रीवादळाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून वादळी वाऱ्यामुळे आज (दि. 16 मे) सकाळी कोकणातील नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेला बसला आहे. राविवारी सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगावहून थिवीमकडे जात असताना या रेल्वेचा अपघात होताहोता वाचला. एक भले मोठे झाड कोकण रेल्वे मार्गावर कोसळल्याने मध्येच ही रेल्वे थांबवावी लागली. लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवून वाहतूक सुरळीत केल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे नेत्रावती एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशिराने धावत आहे.
झाडे कोसळून नुकसान, एकजण सुदैवाने वाचला
या वादळामुळे गोव्यात अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे काही भागातील वीज खंडित झाली आहे. गोवा-वेल्हा मार्केट जंक्शन येथे खूप जुना वटवृक्ष पडल्यामुळे मुख्य रस्ता अडविला गेला. चारचाकी चालक उमेश नाईक या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. वटवृक्ष कोसळत असताना नाईक हा चमत्कारिकरित्या निसटला त्यामुळे तो वाचला आहे. पणजीतही मुख्य मार्गावर नारळाचे झाड कोसळले. पणजीचे आमदार बाबुश मोनसेरात रविवारी रस्ता मोकळा करण्याच्या कामावर स्वत: लक्ष ठेऊन असताना दिसले. वास्को रेल्वे स्थानकाशी संबंधित पोलीस कर्मचार्यांनी राष्ट्रध्वज येथील ध्वज चौकापासून वेगळा झाला होता तो तत्काळ गोळा केला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे हा ध्वज कोसळला होता. तर पणजीत ईएसजीच्या बाहेर पडलेले झाड काढून पणजी पोलिसांनी येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे दर्शनी ग्लास जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले आहेत.
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली
गोव्याच्या किनारी भागातही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. समुद्राच्या उंचच उंच लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. कोळंब काणकोण भागातील लोकवस्तीत पाणी शिरले आहे. बाग, मिरामर, हरमल, किरणपणी, मडगाव या भागातही रहिवासी क्षेत्रात पाणी घुसले आहे. जोरदार उसळणाऱ्या लाटांच्या तडाख्याने काणकोण येथील समुद्रकिनारच्या लोकवस्तीत जाणारा मार्ग वाहून गेला आहे. येथील मच्छिमार बांधव चांगलेच घाबरलेले आहेत. आपल्या मच्छिमार नौका वाचविण्याचा प्रयत्न हे लोक करताना आजही दिसत होते.
हेही वाचा -'तौक्ते’ चक्रीवादळ सिंधुदुर्गाच्या समुद्र हद्दीत दाखल, गोवा-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू