भुवनेश्वर (ओडिशा):माजी रेल्वे राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी बालासोरमध्ये अपघातस्थली पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसचे प्रभारी ए चेल्ला कुमार यांना ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी भेट देण्यासाठी नियुक्त केले आहे. एम्स दिल्लीचे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक गंभीर रूग्णांना उपचार देण्यासाठी पोहोचणार आहेत.
- ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह घेऊन एम्स भुवनेश्वर येथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. 100 मृतदेह एम्स भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे भुवनेश्वरच्या सहपोलीस आयुक्त प्रतीक गीता सिंह यांनी सांगितले.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
- केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या ठिकाणी पूर्ववत स्थिती होण्यासाठी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे.
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वेमंत्री म्हणाले, की आम्हाला पूर्ण पारदर्शकता हवी आहे. ही वेळ राजकारण करण्याची वेळ नाही. परिस्थिती पूर्ववत होईल याची खात्री करण्यावर भर द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. रुग्णालयातील जखमींची विचारपूस केली आहे. सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अपघाताची सरकार चौकशी करणार आहे. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही. ज्यांनी अपघातानंतर मदत केली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो.
- दोन्ही पॅसेंजर गाड्यांचे इंजिन चालक आणि गार्ड चमत्कारिकरित्या बचावले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट आणि त्याचा सहाय्यक तसेच गार्ड आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा गार्ड जखमी आहेत. ही माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांनी दिली.
-
बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे रुळावरून घसरल्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा शोक म्हणून दुखवटा घोषित केला आहे. या अपघातात शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी किमान 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर आणखी इतर 900 जण जखमी झाले आहेत.
-
प्राथमिक तपासात समोर आले आहे की कोरोमंडल एक्स्प्रेस गाडी लूप लाइनमध्ये घुसली. बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डबे शेजारच्या रुळावर विखुरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांवर आदळल्यानंतर उलटले. कोरोमंडल एक्सप्रेस 128 किमी प्रतितास वेगाने धावत होती तर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस 116 किमी प्रतितास वेगाने धावत होती.
-
एम्स भुवनेश्वरच्या डॉक्टरांचे दोन पथक बालासोर आणि कटकसाठी रवाना करण्यात आले आहे. बचाव मोहिम संपल्याचे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून जाहीर केले आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाला जाणार आहेत. प्रथम ते बालासोर येथील अपघातस्थळाला भेट देतील आणि त्यानंतर कटक येथील रुग्णालयाला भेट देतील. पंतप्रधान मोदी यांनी या अपघातानंतर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या वारसांच्याबद्दल सहवेदनाही मोदींनी व्यक्त केली आहे. तसेच ते आता घटनास्थळ आणि जखमींचीही भेट घेणार आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे अपघातात 238 बळी गेले आहेत. सुमारे 650 जखमी प्रवाशांना गोपालपूर, खंतापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने थोड्याच वेळापूर्वी ही माहिती दिली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊनही जखमींची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वनही केले आहे.
जखमींची संख्याही मोठी आहे. ९०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच खासजी रुग्णालयांनाही रेल्वे अपघातातील रुग्णांच्यावर उपचार करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. रक्ताचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. कालपासून रक्तदात्यांचीही रीघ या ठिकाणी लागली आहे. मोठ्या प्रमाणात त्यामुळे रक्त जमा झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आज त्यामुळे राज्यात कोणताही उत्सव साजरा करण्यात येणार नाही. तसेच कोणताही शासकीय उत्सवाचा कार्यक्रम होणार नाही. राज्याच्या I&PR विभागाने अधिकृत प्रकाशनाद्वारे ही घोषणा केली आहे.
रेल्वेने काही हेल्पलाइन नंबरही जारी केलेले आहेत ते खालीलप्रमाणे...
- इमर्जन्सी कंट्रोल रूम: 6782262286
- हावड़ा: 033-26382217
- खड़गपूर: 8972073925, 9332392339
- बालासोर: 8249591559, 7978418322
- कोलकाता शालीमार: 9903370746
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाचा पूर्णपणे आढावा घेतला. तसेच एनडीआरएफने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गाड्यांचा अपघात एवढा भीषण होता की तीनही गाड्यांचे डबे एकमेकांच्यावर चढले होते. तसेच त्यातून मार्ग काढत मंत्री वैष्णव अपघातग्रस्त परिसरात सर्वत्र फिरून माहिती घेत होते.