इटावा (उत्तर प्रदेश) Train Fire : दिल्लीहून दरभंगा येथे जाणाऱ्या नवी दिल्ली दरभंगा हमसफर एक्सप्रेसला (०२५७०) बुधवारी संध्याकाळी सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागली. बोगीखाली बसवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ट्रेनच्या तीन बोगींमध्ये ही आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात दोन प्रवासी भाजले आहेत.
प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या : मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजता सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा एक्सप्रेसच्या एस १ बोगीला अचानक आग लागली. चालत्या ट्रेनमध्ये धुराचे लोट उठत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला. त्यावेळी ट्रेनचा वेग २० ते ३० किमी दरम्यान होता असं सांगण्यात येत आहे.
क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते : बोगीमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते. आगीत तीन बोगी जळून खाक झाल्या असून एस १ डबा पूर्णपणे जळाला आहे. या अपघातात भाजलेल्या दोन प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेसाठी मोठ्या संख्येनं लोक बिहारला रवाना झाले होते. दरम्यान, ट्रेनच्या जनरल डब्यातून धूर निघू लागला. त्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली. यावेळी ट्रेन इटावा जिल्हा मुख्यालयापासून १० कि.मी. दुर सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ थांबली.
तीन बोगी जळून खाक : ट्रेनचा वेग कमी होताच प्रवाशांनी उड्या मारून आपला जीव वाचवला. काही मिनिटांतच प्रवाशांनी त्यांच्या सामानासह संपूर्ण ट्रेन रिकामी केली. त्यानंतर प्रवासी आणि स्थानकावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. बिहारहून मुझफ्फरपूरला जात असलेल्या कुंदननं सांगितलं की, सराय भूपत स्टेशनवर ट्रेनचा वेग कमी होताच ट्रेनचे पंखे बंद पडले आणि दिवेही गेले. काही वेळातच आरडाओरडा सुरू झाला. दरम्यान, आग लागून चेंगराचेंगरी झाली. सगळीकडे गोंधळ माजला होता. परंतु, सरकारी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. अपघातानंतर एक तासानंतर अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत एस १, २ आणि ३ यां बोगींना आगीनं वेढलं होतं. सध्या प्रशासन आणि अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त आहे.
हेही वाचा :
- Mumbai Fire News : मुंबईतील न्यू पूनमबाग इमारतीला भीषण आग; आगीत होरपळून 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
- Fire In Thane : ठाण्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली भीषण आग; 11 दुचाकींसह 3 कार जळून खाक
- Fire Incidents In Nashik : नाशिकच्या बाजारपेठेत अग्नितांडव; 4 ते 5 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान