लोहरदगा (झारखंड) : झारखंडच्या लोहरदगा येथे एका 15 वर्षीय तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे ट्रॅक्टरखाली येऊन एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी ट्रॅक्टर चालवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मात्र मॉब लिंचिंगच्या शक्यतेला नाकारले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तरुणाचा मारहाणीत मृत्यू : झाले असे की, झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील आरेया गावात ट्रॅक्टरखाली येऊन एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी ट्रॅक्टर चालवणाऱ्या 15 वर्षीय तरुणाला मारहाण केली. यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस मात्र या प्रकरणी मॉब लिंचिंगची बाब नाकारत आहेत. असे असले तरी पोलिसांनी घटनेचा प्रत्येक अंगाने तपास सुरू केला आहे.
5 वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू : आरेया गावातील रहिवासी विशाल प्रजापती (वय 15 वर्षे) हा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करत होता. त्यावेळी श्रेयांश साहू (वय 5 वर्षे) हा मुलगा त्याच्या ट्रॅक्टरमध्ये बसला होता. दरम्यान, ट्रॅक्टर चालवत असताना श्रेयांश अचानक ट्रॅक्टरमधून खाली पडला आणि रोटाव्हेटरमध्ये अडकला. यामध्ये त्याचा वेदनादायक मृत्यू झाला.