अमरोहा (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे 20 डिसेंबर रोजी प्रसूती वेदना होत असल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ऑपरेशन नंतर डॉक्टरांकडून तिच्या पोटात टॉवेल राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (towel left in womb of women during operation). ही बाब निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव सिंघल यांनी बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अद्याप पीडितेने कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. (operation in amroha)
काय आहे संपूर्ण प्रकरण : नौगावाना सादत पोलीस स्टेशन हद्दीतील बनशेडी गावातील रहिवासी समशेर अली यांनी सांगितले की, प्रसूतीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने 20 डिसेंबर रोजी पत्नी नजरानाला डॉ. मतलुब संचालित सैफी नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. येथील ऑपरेशनदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहून गेला. नजरानाने पोटदुखीची तक्रार डॉ. मतलुब यांच्याकडे केली असता, डॉक्टरांनी तिला पाच दिवसांनी म्हणजे 25 डिसेंबर रोजी थंडीचे कारण सांगून घरी पाठवले.