- मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. विमान, ट्रेन आणि रोडने येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा कोरोना चाचणी करण्याचा नियम लागू असेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले. आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.
सविस्तर वाचा-विचाराअंती लॉकडाऊनचा निर्णय; 25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक
- नवी दिल्ली -आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
सविस्तर वाचा-आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन
- मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे मुख्य शस्त्र म्हणजे मास्क. त्यामुळे, आता मास्कशिवाय पर्याय नसून सद्या नागरिकांचा कल कापडी मास्क, डिझायनर मास्क, कपड्यांना मॅचिंग मास्ककडे असल्याचे दिसते. पण हे मास्क कोरोना विषाणूला खरेच रोखू शकतात का? ते त्या गुणवत्तेचे आहेत का? असा प्रश्न आहे, असे म्हणत आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) थेट राज्य सरकारलाच पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार कापडी मास्कची गुणवत्ता निश्चित करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
सविस्तर वाचा-एफडीए म्हणते, नागरिकांनो सध्या तरी 'हे' मास्क वापरा!
- मुंबई - वीजबिल, शाळांची फी आणि कॊरोना यासह अनेक मुद्द्यांवरून आता मनसेने महाविकास आघाडी सरकारला त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तर याविषयी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष आहे, असा आरोप केला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन झाल्या आता भाजपची घेतली आहे. त्यांचं अस्तित्वच यावर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सविस्तर वाचा-मनसे सुपारीवर चालणारा पक्ष -अनिल परब
- हिंगोली- राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. तेव्हापासून भाजपाकडून वारंवार सरकार पाडण्यासंदर्भातील वक्तव्ये केली जात आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित केले आहे. जोपर्यंत जनतेचा मूड आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. या सरकारकडून वर्षभरातच जनतेची फार निराशा झालेली आहे, एवढेच नव्हे तर हे सरकार अनैसर्गिक स्थापन झालेले आहे. या सरकारला जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात यश आलेले नाही. बिहारच्या निवडणुकीवरून सर्वकाही परिस्थिती लक्षात आलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी दरेकर यांनी केली आहे.