आज या घडामोडींवर असणार नजर
- महाराष्ट्रात 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे ‘मिशन कवच कुंडल’ सुरू राहणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे टार्गेट केंद्राने दिले आहे. त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
- आयपीएलच्या मोसमातील शेवटचे दोन सामने आज संध्याकाळी एकाच वेळी साडेसात वाजता खेळले जाणार आहेत. हा सामना सनरायझर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
- स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सेलकडून MAH LLB 5-Year CET Admit Card 2021 जारी करण्यात आली आहेत. सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले आहेत. अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org याला भेट द्यावी लागणार आहे. ही परीक्षा यंदा 8 ऑक्टोबरला होणार आहे.
- भविष्य निधी संघटनच्या (इपीएफओ) मुख्य समितीची 8 ऑक्टोबर रोजी बैठक होत आहे. बाजारातील गुंतवणुकीच्या प्रमाणावर बैठकीत विचार करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रश्न प्रलंबित असून, या विषयी या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
- सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंद अडसूळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने आनंद अडसुळांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने आनंद अडसुळांना याचिकेत सुधारणा करण्याची मुभा देत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
- मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेले लिपिक वर्गातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ ऑक्टोबरला पालिका मुख्यालयावर लॉंगमार्च काढणार आहेत. यादिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
- ८ ऑक्टोबर १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या-
- लखनौ - भाजपाने उत्तरप्रदेशमधील निवडणुका समोर ठेऊन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील नेत्यांचं पारड जड आहे. कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील इतर आठ नेत्यांना देखील स्थान देण्यात आले आहे. तर विशेष म्हणजे खासदार वरूण गांधी आणि मेनका गांधी यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे.
सविस्तर वाचा- भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित; वरूण आणि मेनका गांधींना वगळले
- श्रीनगर (ज.का) -प्रदेशातून पुन्हा थरारक बातमी समोर आली आहे. श्रीनगर येथे दोन शिक्षकांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. इदगाह येथील गव्हरमेंट बाईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अतिरेक्यांनी शाळेच्या आवारात त्यांच्यावर गोळीबार केला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे, ती शाळेची प्राचार्य असून सुपिंदर कौर असे त्यांचे नाव आहे, तर इतर मृत व्यक्तीचे नाव दीपक चंद असे आहे. सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेराव घातला आहे.
सविस्तर वाचा-श्रीनगरमध्ये शाळेत दहशतवादी हल्ला, महिला प्राचार्यासह शिक्षकाचा मृत्यू
- बारामती - एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. परंतु गुरुवारी (दि. ७) अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरी छापे टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामतीतील गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते.
सविस्तर वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
- मुंबई - भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. गुजरातमधील दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येथून शिवसेनेने दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.