आज दिवसभरात -
- पंतप्रधान मोदींचे आज जागतिक आर्थिक परिषदेत विशेष भाषण
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रात्री 8.30 वाजता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेत विशेष भाषण करणार आहेत. ही परिषद यंदा कोरोनामुळे प्रत्यक्षात होणार नसून, व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे परिषद भरवण्यात आली आहे. १७ ते २१ जानेवारी दरम्यान ही परिषदर होणार आहे.
- मुंबईमधील चार हजार आरोग्य कर्मचारी आज संपावर
मुंबई - कम्युनिटी हेल्थ वर्कर्स मुंबईमध्ये ( Mumbai Community Health Worker ) तळागाळात जाऊन आरोग्य विभागाचे काम करतात. मात्र, त्यांना किमान वेतन आणि सामान्य अशा सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत गेले कित्येक वर्षे मागणी करूनही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महापालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) दुर्लक्ष केले जात असल्याने, आज (सोमवारी) संपावर जाण्याचा निर्णय घेतला ( Community Health Workers Strike ) आहे.
- भाजपातून हकालपट्टी झालेले कॅबिनेट मंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत ( Harak Singh Rawat Expelled From BJP ) यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत ( EX CM Harish Rawat ) आणि राज्यातील इतर नेत्यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत हरक सिंग आणि त्यांची सून अनुकृती हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. हरकसिंग रावत यांच्यासोबत आणखी काही आमदारही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- डॉक्टरांचे आजपासून मुंबईत साखळी उपोषण
मुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापक यांच्या सेवा नियमित कराव्यात, या मागणीसाठी आजपासून मुंबईत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या साखळी उपोषणात राज्यातील सर्व १८ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक (डॉक्टर) सहभागी होणार आहेत. यापूर्वी कोरोना काळात उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली. अडचणीच्या काळात शासनाला सर्व डॉक्टरांनी मदत केली. मात्र, शासनाने डॉक्टरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. या सर्व घटनेची आठवण करून देण्यासाठी सर्व वैद्यकीय प्राध्यापक (डॉक्टर) साखळी उपोषणाला बसणार आहेत.
- नितेश राणे यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल
मुंबई - नितेश राणे यांच्या जामिनावर आज निकाल येणार आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत.